हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला होता. या धक्क्यामधून काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही. दरम्यान, हरयाणातील निवडणुकीचा निकाल बदलेल, २० जागांवर बाजी पलटेल, अशी आशा असलेल्या काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नवी आणि सुधारित माहिती असलेलं पत्रक घेऊन धाव घेतली आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश हे मतमोजणीच्या दिवसापासूनच सक्रियपणे आपली भूमिका मांडत आहेत.
जयराम रमेश यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल पत्रक शेअर केलं आहे. हे पत्र शेअर करताना जयराम रमेश लिहितात की, ९ ऑक्टोबर निवडणूक आयोगाकडे उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आणि दिलेल्या पत्रकानंतर आम्ही आता हरयाणामधील २० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेमध्ये गंभीर आणि स्पष्ट अनियमितता समोर आणली आहे. तसेच त्यावर आधारित सुधारित पत्रक निवडणूक आयोगाला दिलं आहे. आता निवडणूक आयोग यावर लक्ष देऊन योग्य आदेश देईल, अशी अपेक्षा आहे.
काँग्रेसने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रकामधून २० मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. त्या २० विधानसभा मतदारसंघांमध्ये नारनौल, करनाल, डबवाली, रेवाडी, होडल, कालका, पानिपत सिटी, इंद्री, बडखल, फरिदाबाद एनआयटी, नलवा, रनिया, पटोदी, पलवल, बल्लभगड, बरवाला, उंचा कलां, घरौंदा, कोसली आणि बादशाहपूर विदानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पराभव समोर दिसू लागताच काँग्रेसने ईव्हीएम आणि त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरींबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच निवडणूक आयोगाकडून निकालाची माहिती संथगतीने दिली जात असल्याचाही आरोप केला होता. जयराम रमेश, सुप्रिया श्रीनेत आणि पवन खेडा यांनी याबाबत आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडली होती. तसेच काँग्रेसचे हरयाणातील नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला होता.