लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी निवडणूक आयोगाने सुरू केली असून, लोकसभेला विविध मतदारसंघांमध्ये झालेला मतदारयाद्यांचा घोळ विधानसभेला तरी थांबेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यांतील मतदारयाद्या अद्ययावत करण्याच्या कामास २५ जूनपासून प्रारंभ करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. हेच काम जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही हाती घेण्यात आले आहे. १ जुलैपर्यंत मतदारयाद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १ जुलै रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदारयादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करता येणार आहे.
- या तारखेपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी १८ वर्षे वय पू्र्ण झालेल्या ज्या लोकांनी मतदारयादीत नावनोंदणी केली नाही, त्यांनाही आता नावनोंदणी करता येणार आहे. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांतील विधानसभांची मुदत अनुक्रमे २६ नोव्हेंबर, ३ नोव्हेंबर, ५ जानेवारी रोजी संपत आहे. त्या मुदतीआधीच या विधानसभांच्या निवडणुका होणे आवश्यक आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये होणार विधानसभा
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नुकतेच एका वृत्तसंस्थेला सांगितले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करू. कलम ३७० रद्द केल्यानंतर तसेच जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश असल्याचे जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच तिथे विधानसभा निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील मतदारयाद्या अद्ययावत करण्यात येतील. या कृतीद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांनी निवडणूक चिन्ह मिळण्यासाठी केलेले अर्ज स्वीकारण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने तातडीने लागू केला. हा निर्णय ७ जून रोजी घेण्यात आला होता.