सचिन लुंगसे, वरिष्ठ वार्ताहर, मुंबई
कधी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची अन् पाऊस पडला तर एकदम धो...धो... सगळीकडे पाणीच पाणी.... शेती, पिके वाहून जाणारी अतिवृष्टीच. एवढंच कशाला यंदाच्या उन्हाळ्याने 122 वर्षांचा विक्रम मोडला. मार्च सर्वाधिक उष्ण महिना नोंदविला गेला. हे सगळं 100-150 वर्षांत कधीतरी व्हायचं. मात्र, आता सातत्याने हे घडतंय. थंडीतही तसंच पडली तर एकदम रक्त गोठवणारी. हे असंच सुरू राहिलं तर पुढील पिढ्यांसमोर अन्नापाण्यापासून अनेक संकटं उभी ठाकणार आहेत. मुंबईसारखं महाकाय शहर बुडणार तर नाही ना, अशीही भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
अहवाल काय म्हणतात?
गेल्या पंधरा वर्षांत आलेल्या अहवालानुसार, हरितगृह वायू उत्सर्जन वाढत असून, त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्याचे परिणाम नागरिकांना आता जाणवू लागले आहेत. जागतिक तापमानवाढीचा परिणाम शेती, आरोग्य, अर्थव्यवस्थेवर होत असतो.
चक्रीवादळे वाढणार
ऊर्जानिर्मितीसाठी आपण जी साधने वापरतो त्यातूनही उत्सर्जन होते. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. हा वायू हवेच्या वरच्या थरात जातो तेव्हा उष्णता शोषली जाते. कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान वाढते. समुद्राचे तापमान वाढत आहे. परिणामी अंटार्टिका आणि आर्टिक ध्रुवावर तापमान वाढते. याचा परिणाम बर्फ वितळतो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले की चक्रीवादळाचा धोका वाढतो. समुद्राचे तापमान वाढले की अल निनो मान्सूनला घातक ठरतो. त्याचा प्रभाव मान्सूनवर होतो. पर्यावरणातला प्रत्येक घटक एकमेकांशी निगडित आहे. सतत राहणारे पावसाचे दिवस कमी होत आहेत. कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे.
राजकीय इच्छाशक्ती हवी
जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक राज्याला आपला हवामान कृती आरखडा कठोर पद्धतीने राबवावा लागणार आहे. राजकीय इच्छाशक्ती आणखी पणाला लावावी लागणार आहे. जेव्हा राजकीय पक्षांच्या अंजेड्यात स्वच्छ हवा हा विषय येईल तेव्हा आपण जागतिक तापमानवाढीविरोधातील अर्धी लढाई जिंकलेली असेल.
संकट मोठे आहे
गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटा, कमी दिवसांत पडणारा जास्त पाऊस, लांबलेले मान्सूनचे आगमन हे सगळे आपण अनुभवले आहे.
नवी आव्हाने पेलणार कशी?
पॅरिस करारानुसार आपल्याला उत्सर्जन कमी करत दशकभरात तापमान दीड अंशाने कमी राहील, यासाठी काम करायचे आहे. आपल्या तापमानवाढीचा वेग कमी करायचा आहे. हे आव्हानात्मक आहे. कोरोनादरम्यान आपण स्वच्छ पर्यावरण अनुभवले. मात्र, आपण निसर्गाची एवढी हानी केली आहे की तो बदल तात्पुरता राहिला.