विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच जम्मू-काश्मीरातील राजकीय वर्तुळात, नॅशनल कॉन्फरन्सची भाजपसोबत युतीसंदर्भात बोलणी सुरू आहे का? यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता नॅशनल कॉन्फरन्सची प्रतिक्रिया आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे की, आम्ही मागच्या दाराने INDIA अलायन्सच्या बाहेर एखाद्या वेगळ्या युतीसंदर्भातील चर्चेचे खंडन करतो. तसेच जनतेला आवाहन करतो की, अशा प्रकारच्या कुठल्याही अफवांवर विश्वस ठेऊ नये. आम्ही अशा अफवा फेटाळतो.
श्रीनगरचे माजी महापौर जुनैद अजीम मट्टू यांनी एका एक्स पोस्टमध्ये दावा केला होता की, "फारूक अब्दुल्ला यांची भाजपच्या एका प्रतिनिधीसोबत पहलगाममध्ये एकदा नव्हे तर दोन वेळा भेट झाली आहे. अखेर या दोघांमध्ये कोणत्या करारासंदर्भात चर्चा झाली. नॅशनल कॉन्फरन्सने भाजपसंदर्भात जे काही बोलले होते त्या सर्वांचे काय झाले?" मट्टू यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपच्या युतीचे कयास लावायला सुरुवात झाली आहे.
खरे तर, मट्टू यांच्या आधीही अनेकांनी असे कयास लावले आहेत की, जर भाजप अथवा एनसी अथवा इतर कुणालाही पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर युती होऊ शकते आणि अशा स्थितीत टोकाचे विरोधक असलेले भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सदेखील सोबत येऊ शकतात.
मट्टू यांच्या ट्वीटवर एका युजरने लिहिले होते की, ही अफवा आहे की सत्य? याला उत्तर देताना मट्टू म्हणाले होते, 'अफवा? फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाममध्ये बिगर राजकीय मध्यस्थांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकांशी चर्चा केली. आता यावर नॅशनल कॉन्फरन्सला बोलू द्या. मग मी सांगेन. कोणत्या ठिकाणी? कोणते लोक होते? आणि काय चर्चा झाली? सर्व माहितीच देईन.