जयपूर : केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. प्रत्येक पदवी आणि पदविकाधारक तरुणांना सरकारी किंवा खासगी कंपनीत एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप) दिले जाईल. त्यासाठी त्याला एका वर्षात १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसवाडा येथे केली.
बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ज्यात भरतीची हमी, पहिल्या नोकरीची हमी, पेपरफुटीपासून मुक्तता, ‘गिग इकॉनॉमी’त सामाजिक सुरक्षा आणि ‘युवा रोशनी’ यांचा समावेश राहील.
आम्ही देशातील सर्व तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. त्यासाठी वर्षभरात त्याला १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा मनरेगासारखा हक्क असेल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एकप्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच रोजगार मिळेल.
‘गिग वर्कर्स’साठी सुरक्षा कायदाओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन इत्यादी कंपन्यांसाठी चालक, सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’साठी सामाजिक सुरक्षा कायदा आणण्याची घोषणाही गांधींनी केली.राजस्थानमधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने असा कायदा केला होता. हाच कायदा आम्ही संपूर्ण देशात लागू करू, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी ‘युवा रोशनी’ योजनेची घोषणा केली. ज्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांना पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी दिला जाईल. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले.