वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? सोशल मीडियावरील जुन्या फोटोमुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 05:45 PM2024-03-25T17:45:28+5:302024-03-25T17:46:32+5:30
Varun Gandhi News: उत्तर प्रदेशात भाजपाने (BJP) अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या नेत्यांमध्ये पीलीभीत येथील खासदार वरुण गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. (Lok Sabha Election 2024) मात्र भाजपाने वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची घोषणा करताना भाजपाने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. भाजपाने अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या नेत्यांमध्ये पीलीभीत येथील खासदार वरुण गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र भाजपाने वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आज सकाळी काँग्रेस नेत्या अर्चना चौबे यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमुळे राहुल गांधी आणि वरुण गांधी हे पुन्हा एकत्र येतील का याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या फोटोखाली अर्चना चौबे यांनी लिहिलंय की, या फोटोमध्ये राहुल गांधी, वरुण गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र दिसत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. काही लोकांनी वेगवेगळे पर्याय सांगण्यास सुरुवात केली आहे. वरुण गांधी यांनी अमेठी किंवा वाराणसी येथून लढावं आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्यांच्या मागे उभं राहावं, असे सल्लेही दिले जात आहेत.
सध्याची वेळ पाहता या फोटोमधून खूप राजकीय संदेश देण्यात आलेले आहेत. मात्र हा फोटो खूप वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा राहुल गांधी आणि वरुण गांधी लहान होते. या फोटोमध्ये राहुल गांधी हे वरुण गांधींना उचलून घेताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत वरुण गांधी यांचं राजकीय भवितव्य अंध:कारमय झालं असताना त्यांचे मोठे भाऊ असलेले राहुल गांधी हे त्यांना मदत करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. या फोटोमध्ये दोन्ही भावांमधील प्रेम दिसत आहे. मात्र इंदिरा गांधी हयात असताना गांधी कुटुंबामध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर मनेका गांधी वरुण गांधी यांच्यासह घर सोडून निघून गेल्या होत्या. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत राजकीय जीवनात पदार्पण केलं होतं.
दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता वरुण गांधी हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, असा दावा लोकांकडून केला जात आहे. तसेच काँग्रेसने या कठीण काळात वरुण गांधी यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. तसेच उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा प्रभाव असलेल्या प्रभाव असलेल्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली पाहिजे, असा सल्लाही लोकांकडून दिला जात आहे. हा फोटो पाहिल्यावर राहुल गांधी हे वरुण गांधी यांना आपल्यासोबत घेतील, असे बोलले जात आहे. राहुल गांधी हे त्यांचे धाकटे भाऊ असलेल्या वरुण गांधी यांच्यापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठे आहेत.
मात्र सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांबाबत वरुण गांधी यांच्याकडून मात्र अद्याप कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र वरुण गांधी यांनी निवडणूक लढवण्याची तयारी ही आधीपासूनच केलेली आहे. दरम्यान, वरुण गांधी यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या मातोश्री मनेका गांधी ह्याही नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पक्षनेतृत्वासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच सुल्तानपूर येथून उमेदवारी मिळाल्यानंतरही त्या मोठा निर्णय घेऊ शकतात.