नवी दिल्ली - भाजपाच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक असलेले वरुण गांधी गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. तसेच ते केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, पक्षनेतृत्वावर नाराज असलेले वरुण गांधी हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरुण गांधी हे सध्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तसेच पुढच्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे.
वरुण गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. तसेत आपल्या वक्तव्यामधून भाजपा आणि भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारांवर टीका करत असतात. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपाच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून वरुण गांधी भाजपाविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. तसेच महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य दिनावरून सोशल मीडियावर आक्रमकपणे भूमिका मांडली होती.
पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस देशभरात काँग्रेसला पर्याय ठरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हिंदी भाषी आणि अन्य राज्यांमध्ये प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ममता बॅनर्जी पुढच्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यादरम्यान वरुण गांधी यांच्यासोबत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एका प्रस्थापित नेत्याचा शोध तृणमूल काँग्रेसकडूनही घेण्यात येत आहे.
दुसरीकडे वरुण गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशमधील प्रभारी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा झाल्याची चर्चाही उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र त्या चर्चेचे परिणाम अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, याबाबत भाजपाच्या नेत्याने सांगितले की, वरुण गांधींची प्रियंका गांधींशी भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र जर त्यांनी पक्ष सोडला तर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांना अधिक पर्याय नाही आहेत. तसेच हिंदी भाषिक राज्यांमध्ये पकड मिळवण्यासाठी तृणमूल काँग्रेसला थोडा वेळ लागणार आहे.