काँग्रेसचे सरकार आल्यास तुम्ही मुख्यमंत्री होणार का? रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्टच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:46 AM2024-09-12T11:46:16+5:302024-09-12T11:56:54+5:30
Randeep Surjewala : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
haryana assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि इतर प्रादेशिक राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. बुधवारी अनेक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदारी अर्ज दाखल केले. दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
हरियाणात काँग्रेसचे सरकार आले तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असाल का? असा सवाल रणदीप सुरजेवाला यांना विचारण्यात आला. यावर, राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे ही वाईट गोष्ट नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा असली पाहिजे, तरच माणूस पुढे जाऊ शकतो. मात्र, पक्षाच्या शिस्तीपेक्षा महत्त्वाकांक्षा मोठी असू शकत नाही. पद मिळवणं हे आमचे उद्दिष्ट असू शकत नाही, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
राज्यातील जनतेच्या भावनांवरून असं दिसतंय की, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ७० हून अधिक जागा जिंकेल. विजयाचा आकडा ८० पर्यंत पोहोचू शकतो. असं घडल्यास कोणालाही आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले. तसंच, आप आणि काँग्रेसच्या युतीवर ते म्हणाले की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचा निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व आणि राहुल गांधी घेतात. हरियाणात युतीची गरज नाही कारण काँग्रेस स्वबळावर राज्यात सरकार बनवत आहे.
दरम्यान, हरियाणात काँग्रेस आणि आपच्या युतीबद्दल चर्चा सुरू होती, मात्र अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला सुटला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी आपचे नेते राघव चढ्ढा म्हणाले होते की, आम्हाला युती हवी आहे आणि यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल. मात्र, आपनं ज्या पद्धतीनं निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावरून हरियाणात आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.