कथित मद्यघोटाळ्यामुळे दिल्लीतील आम आदमी पक्षाचं सरकार मागच्या दीड दोन वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करत आहे. दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमधील उपमुख्यमंत्री राहिलेले मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी १७ महिने तुरुंगात राहावे लागले होते. १७ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया हे कमालीचे सक्रिय झाले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया हे पुन्हा एकदा दिल्लीचं उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी दिल्लीमधील जनतेच्या भेटीगाठी घेण्यासाठी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदयात्रेला सुरुवात होण्यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी पुन्हा दिल्लीच्या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत सूचक विधान केले. मी पुन्हा सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो. मात्र त्याची मला कुठलीही घाई नाही आहे. मी आताच बाहेर आलोय. एकदम सरकारमध्ये जाऊ. सध्यातरी मला जे कार्यकर्ते भेटायला येत आहेत, ते मी त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये यावं, यासाठी आग्रह धरत आहेत. अरविंद केजरीवाल हेसुद्धा लवकरच तुरुंगातून बाहेर येतील. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
मनीष सिसोदिया पुढे म्हणाले की, एक दोन महिन्यांमध्ये परत आलो असतो, तर काम पुढे चालू ठेवूया, असं म्हटलं असतं. मात्र मी आता पाहतोय की, जे काम मी सोडून गेलो होतो, ते अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे मला कुठलीही घाई नाही आहे. जेव्हा मुख्यमंत्री तुरुंगामधून बाहेर येतील, तेव्हा पक्षाचं नेतृत्व मी सरकारमध्ये सहभागी व्हायचं की पक्षाच्या निवडणूक प्रचाराचं काम करायचं याबाबतचा निर्णय घेईल. आमच्या पक्षात सगळे समजूतदार लोक आहेत. मला निवडणुकीचा प्रचार करण्याची परवानगी दिली गेली, तर मला तेही आवडेल, असं सूचक विधान मनीष सिसोदिया यांनी केलं.