नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना केवळ गंमत म्हणून बोलावण्याची इच्छा आहे काय, असा सवाल करीत विशेष न्यायालयाने सोमवारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांची कानउघाडणी केली. कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाबाबत कटाचा आरोप करताना कोडा यांनी मनमोहनसिंग यांना न्यायालयात पाचारण करण्याची विनंती याचिकेत केली होती. त्यासंबंधी युक्तिवादात सातत्य न राखता आल्यामुळे न्यायालयाने त्यांना जाब विचारला.सीबीआयने आरोपपत्रात नमूद केल्याप्रकारे कोणताही कट रचण्यात आला नसल्याचा युक्तिवाद कोडा यांचे वकील अंशुमन सिन्हा यांनी केल्यानंतर न्यायाधीशांनी तुम्ही मनमोहनसिंग आणि अन्य दोघांना न्यायालयात पाचारण करण्याबाबत जो अर्ज केला त्याच्याशी सुसंगत असे विधान करा. त्यावेळी तुम्ही कट असल्याचा आरोप केला होता. आता तुम्ही कोणताही कट नसल्याचे म्हणत आहात. केवळ माजी पंतप्रधानांना पाचारण केले जावे यासाठी गंमत म्हणून तुम्ही अर्ज केला काय? असा सवाल सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी सिन्हा यांना केला. (वृत्तसंस्था)- सीबीआयनेच कटाचा आरोप केल्यामुळे मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून पाचारण करण्याची विनंती केली होती. या घोटाळ्याचा कट रचण्यात आला असेल तर सिंग यांनाही बोलावले जावे एवढेच मी म्हटले होते. - सीबीआय वेगळे निकष वापरू शकत नाही, असे सिन्हा यांनी उत्तरात न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने यापूर्वी मनमोहनसिंग आणि अन्य दोघांना समन्स पाठविण्यासंबंधी याचिका फेटाळली होती. कोडांचा समावेश पाहता कोणताही कट रचल्याचे पुरावे आढळून येत नाहीत, असेही सिन्हा यांनी नमूद केले.
माजी पंतप्रधानांना गंमत म्हणून बोलावणार काय?
By admin | Published: December 01, 2015 2:40 AM