लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तरुण पिढीमध्ये भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाविषयी जागरूकता पसरविण्यासाठी आणि कारगिलमधील विजयाचे २५ वे वर्ष साजरे करण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवारी नवी दिल्लीतील माणेकशॉ क्लबमध्ये ‘इंडियन आर्मी क्विझ’ सुरू केली. ‘बॅटल ऑफ माइंड्स’ शीर्षक असलेल्या या क्विझचे उद्दिष्ट देशभरातील सुमारे १५,००० शाळांपर्यंत पोहोचण्याचे आहे.
ही प्रश्नमंजूषा १० ते १६ वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. ती तीन टप्प्यांत होईल. त्याची सुरुवात ऑनलाइन फेरीपासून होईल, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय फेऱ्या होतील. विशेष म्हणजे, शाळा, विद्यार्थी आणि सोबत असलेल्या शिक्षकांसाठी ४ कोटी रुपयांहून अधिक बक्षिसे, टॉप १२ शाळांसाठी बसची सुविधा आणि ३६० हून अधिक लॅपटॉप्ससह इतर बक्षिसे आहेत.
देशातील दीड लाख शाळा सहभागी होणार
- या उपक्रमात सहभागी होण्याची संधी भारतातील सर्व जिल्ह्यांना खुली असून देशभरातील सुमारे दीड लाख शाळा यात सहभागी होऊ शकतात. - अशा प्रकारे, या स्पर्धेत देशभरातील अंदाजे १.५ कोटी विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. तीन विद्यार्थी आणि एक राखीव विद्यार्थी, अशा संघासह शाळांनी सहभागी व्हायचे आहे. - सह-शैक्षणिक शाळांमधील म्हणजे मुले-मुली एकत्र शिकत असलेल्या शाळांमधील संघांमध्ये किमान एक विद्यार्थिनी असणे अनिवार्य आहे. - सहभागींची वयोमर्यादा १० ते १६ वर्षे (म्हणजे साधारणपणे सहावी ते दहावी इयत्ता) अशी आहे. ही स्पर्धा, ऑनलाइन आणि ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाईल.