लखनौ - भाजपाकडून आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यातच, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी आणि योगी आदित्यनाथ यांच्यात शाब्दीत लढाई रंगत आहे. योगींना मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे औवेसी यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे भाजपा 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचा दावा, योगी आदित्यनाथ यांनी केलाय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते असल्याचं वक्तव्य करत त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं होतं. "ओवेसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेष समाजाचं समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाही. भाजपं आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकार करतो," असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. त्यातच, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 403 पैकी 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद अन् पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भाजपने 75 पैकी 67 जागांवर विजय मिळवला आहे. त्याबद्दल भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना, योगींनी हा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, ओवेसी यांचा एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे.