हैदराबाद: हैदराबादमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रविवारी संपली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही सहभागी झाल्या होत्या. सभेच्या समारोपीय भाषणात खर्गे यांनी कार्यकर्त्यांना व नेत्यांना विश्रांती न घेता काम करण्याचा सल्ला दिला.
केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचे हैदराबादमध्ये आयोजन करण्यात आले. यावेली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजूटीने काम करण्याचा सल्ला दिला. काँग्रेसच्या यशाला प्राधान्य द्या आणि पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करू नये, असे ते यावेळी म्हणाले.
खर्गेंनी काँग्रेस नेत्यांना आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन करताना म्हटले की, देशात परिवर्तनाची चिन्हे दिसत आहेत, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल याचा पुरावा आहेत. सर्वप्रथम पीसीसी, डीसीसी आणि ब्लॉक कमिटी बनवण्याचे काम पूर्ण करा. यात काही अडचण असेल तर संघटनेच्या सरचिटणीसांना भेटा, आम्हाला भेटा, आम्ही तोडगा काढू. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीपर्यंत तयारी ठेवावी लागणार आहे.
नेते व कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देत खर्गे म्हणाले की, आपल्याला 18 ते 25 वयोगटातील मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना आपली विचारधारा, इतिहास आणि आपले कार्य सांगावे लागेल. पक्षाची विचारधारा देशाच्या तरुण पिढीपर्यंत पोचवणाऱ्या तरुण वक्त्यांची संपूर्ण फौज तयार करायला हवी. प्रत्येक भागातील मतदार यादीची छाननी करावी लागणार आहे. त्यासाठी संघटनेच्या सरचिटणीसांनी आढावा बैठक बोलवावी. येत्या काही दिवसांत बूथपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल.