नवी दिल्ली : काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने सत्तारूढ भाजपवरील आपला हल्ला अधिक तीव्र करीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत तीव्र निदर्शने केली.दिल्लीच्या न्यायालयाने बुधवारी इराणी यांच्याविरुद्धच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर काँग्रेसने नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करीत दिल्लीत दोन ठिकाणी निदर्शने केली. ललित मोदीप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याबद्दलही काँग्रेसने पंतप्रधानांवर तोफ डागली.दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जंतरमंतर येथे निदर्शने केली आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचे दहन केले. भाजपसोबत आम आदमी पार्टीला लक्ष्य करताना माकन म्हणाले, ‘दोघेही लबाड आहेत. भाजप मोठा आणि आप छोटा आहे. आपकडे एकच जितेंद्र तोमर आहेत, तर भाजपकडे चार लबाड मंत्री आहेत आणि हे पक्ष पारदर्शकतेच्या गोष्टी करतात. त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे आणि या दोन्ही पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे.’महाराष्ट्रातील भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध लावण्यात आलेल्या आरोपाचा मुद्दाही माकन यांनी उपस्थित केला. मुंडे या बालकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने स्वराज आणि राजे यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, काँग्रेस नेत्या शोभा ओझा यांच्या नेतृत्वात पक्षाच्या महिला शाखेतर्फे भाजप मुख्यालयाबाहेर स्वराज, राजे आणि इराणी यांच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. कलंकित मंत्र्यांना बरखास्त करा -आपललित मोदी प्रकरण आणि अन्य घोटाळ्यांवर मौन पाळून असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागताना आम आदमी पार्टीने गुरुवारी कलंकित मंत्री व नेत्यांना बरखास्त करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला. ललितगेट प्रकरणात अडकलेल्या सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे, बोगस पदवी घोटाळ्यात सापडलेल्या स्मृती इराणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपाने बरखास्त केले नाही तर देशव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असे आपचे नेते आशुतोष यांनी म्हटले आहे.पंतप्रधान टिष्ट्वट करतात. पण या मुद्यावर त्यांनी मौन का पाळले आहे? भाजपचे चार वरिष्ठ नेते आज आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. सोनिया गांधी मनमोहनसिंग यांना रिमोटद्वारे संचालित करीत. आता रा. स्व. संघ मुख्यालय मोदींना रिमोटद्वारे संचालित करतो, असा आरोप आशुतोष यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘चारचौघीं’चा राजीनामा हवा
By admin | Published: June 26, 2015 12:08 AM