जयपूर : राजस्थानमधील काही भागांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरू झालेले वादळी वारे मंगळवारी दिवसभर वाहत होते. दुपारनंतर त्याचा वेग वाढला आणि तेथील जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या वादळामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.गेल्या आठवड्यात राजस्थानात धुळीच्या वादळाने ५0 जणांचे, तर उत्तर प्रदेशात ८0 व मध्य प्रदेशात चार जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे यावेळी प्रशासनाने अधिक काळजी घेतली आहे. मध्य प्रदेशला लागून असलेल्या धौलपूर भागात सकाळीच धुळीचे वादळ सुरू झाले आणि त्यामुळे दोन्ही राज्यांच्या काही भागात बरीच वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे.अजमेर,जयपूर व परिसरातील भागात वादळी वारे वाहत होते, तर बिकानेरला धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. राजस्थानातील सिकर, अजमेर, नागौर, जयपूर, दौसा, अलवार, टोंक या भागामध्ये वादळी वारे होते. उत्तर प्रदेशात यावेळी वादळाचा जोर जवळपास नाही. दिल्लीत मात्र संध्याकाळी धुळीचे वादळ झाल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले. (वृत्तसंस्था)
राजस्थानात वादळी वारे; जीवितहानी मात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:35 AM