लखनऊ :उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मद्य विक्री आणि परवाना प्रक्रिया सुलभ केल्यामुळे आता रेल्वे आणि क्रूझमध्येही मद्य विक्री करणे शक्य होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अबकारी नियमावली २०२० लागू केली असून, यातील तरतुदीनुसार मद्य परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अबकारी विभागाचे अपर मुख्य सचिव संजय आर भूसरेड्डी यांनी या बाबतची माहिती देताना सांगितले की, मद्य परवानाच्या जुन्या प्रक्रियेला सुलभ करण्यात आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब, बार आणि एअरपोर्ट बार परवाने आता अबकारी आयुक्तांकडून प्रदान केले जातील. मंडळयुक्त बार समितीची जागा आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बार समिती घेईल, अशी माहिती भूसरेड्डी यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाच्या पर्यवेक्षण आणि नियंत्रणाच्या आधीन असलेल्या किंवा त्यांद्वारे अनुरक्षित विशेष रेल्वे तसेच प्राधिकाऱ्यांकडून अनुमोदित क्रुझ यांमध्ये विदेशी मद्य विक्री करण्यासाठी परवाना घेण्याची तरतूद या नवीन नियमावलीत करण्यात आल्याची माहिती भूसरेड्डी यांनी दिली.
नवीन नियमावलीनुसार, जिल्हास्तरीय बार समितीकडे आलेल्या प्रकरणांवर १५ दिवसांमध्ये निर्णय घेणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.