नवी दिल्ली- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केलं आहे. हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या आई-वडिलांनी अटारी बॉर्डरवर हजर राहून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतात स्वागत केलं आहे. वर्धमान यांना आणण्यासाठी हवाई दलाच्या 5 गाड्यांचा ताफा अटारी बॉर्डरवर गेला होता. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासाठी वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट सोहळा रद्द करण्यात आला. अभिनंदन वर्धमान यांना इस्मालाबादहून लाहोरमार्गे वाघा बॉर्डरवर आणलं गेलं असून, त्यांना आता अमृतसरमार्गे दिल्ली घेऊन जाण्यात येणार आहे.भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-21चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केलं आहे.गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी प्रचंड दबाव येत होता. अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारतापुढे शांततेचा प्रस्ताव ठेवला. तसेच पंतप्रधान मोदी यांना बुधवारी संध्याकाळी फोन केला. पण मोदी यांनी त्यांचा फोन घेतला नाही. आधी अभिनंदन यांची सुटका व नंतरच चर्चा वा वाटाघाटी होतील, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे इम्रान खान यांना अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करत त्यांना भारताकडे सोपवलं आहे.