नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचा 87 वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त गाझियाबाद येथील हवाई दलाच्या तळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये हवाई दलाच्या वैमानिकांकडून थरारक हवाई प्रात्यक्षिक दाखवले जात आहेत. या प्रात्यक्षिकांमध्ये एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानने केलेला हल्ला परतवून लावणारे विंग कमांडर अभिनंदन, तसेच पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या हवाई दलाच्या वैमानिकांनी सहभाग घेत हवाई कसरती करून दाखवल्या. यावेळी नवनियुक्त हवाईदल प्रमुख आर.के.एस. भदौरिया, लष्करप्रमुख बीपीन रावत आणि हवाई दलाचा मानद ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर हेसुद्धा उपस्थित होते. एअरस्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 बायसन विमानाचे सारथ्य करत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. दरम्यान, पाकिस्तानी विमानाची शिकार करणाऱ्या अभिनंदन यांनी आज हवाई दलाच्या विमानांच्या संचलनात मिग 21 विमानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. अभिनंदन यांच्या नेतृत्वाखालील विमानांच्या तुकडीने हिंडन हवाई तळावरून फ्लाय पास केला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
रोमांचक! अभिनंदन आणि एअरस्ट्राइकमध्ये सहभागी वैमानिकांनी घडवला हवाई कसरतींचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 12:32 PM