नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात असताना प्रचंड मानसिक छळ करण्यात आल्याची माहिती विंग कमांडर अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. पाकिस्ताननं शारीरिक छळ केलेला नसला, तरी प्रचंड मानसिक वेदना दिल्याचं अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं. अभिनंदन वर्धमान जवळपास 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं. अभिनंदन यांचं मिग 21 विमान पाकिस्तानच्या हवाई दलाच्या कारवाईला प्रत्युत्तर देताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं. मात्र याआधी अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानची विमानं भारतीय हवाई हद्दीत घुसल्यानंतर भारतीय हवाई दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. पाकिस्तानची विमानं भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले करण्याच्या प्रयत्नान असताना भारतीय हवाई दलानं त्यांना माघार घेण्यास भाग पाडलं. मिग-21 विमान कोसळण्याआधी वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ-16 विमानं जमीनदोस्त केलं. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. तिथे काही स्थानिकांनी त्यांना मारहाण केली. यानंतर दोन पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याकडे असणारी गोपनीय कागदपत्रं नष्ट केली. 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात असलेले अभिनंदन काल रात्री वाघा बॉर्डरवरुन मायदेशी परतले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 28 फेब्रुवारीला अभिनंदन यांची सुटका केली जाणार असल्याची घोषणा संसदेत केली होती.