नवी दिल्ली: पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान जमीनदोस्त करणारे, जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. पाकिस्तानी सैन्याला कोणतीही माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांनी पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली. मला लवकरच विमान उडवायचं आहे, अशी भावना अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. नवी दिल्लीतल्या सैन्याच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि वरिष्ठ कमांडोंनी अभिनंदन यांची भेट घेतली. यानंतर वरिष्ठ कमांडो आणि डॉक्टरांकडे अभिनंदन यांनी लवकरात लवकर विमान उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानी हवाई दलाविरुद्ध संघर्ष सुरू असताना अभिनंदन यांनी एफ-16 हे अत्याधुनिक विमान जमीनदोस्त केलं. अभिनंदन हे एफ-16 विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे पहिले वैमानिक आहेत.
अनंत आमुची ध्येयासक्ती! लवकरच पुन्हा विमान उडवायचंय; अभिनंदन यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 8:32 PM