लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे बुधवारी देशभरात पडसाद उमटले. संसदेत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 'जय भीम'च्या घोषणांनी संसद दणाणून गेली होती. विरोधकांनी संसदेच्या आवारात निदर्शनेही केली.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधकांनी लोकसभा व राज्यसभा यादोन्ही सभागृहात गदारोळ केला. सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले. दुपारी दोन वाजेनंतर परत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर पलटवार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार केलेला अपमान भाजप नेत्यांनी उघड केला होता. त्यामुळेच माझ्या भाषणातील डॉ. आंबेडकरांबाबतच्या उल्लेखाचा काँग्रेसने विपर्यास करून त्यावर गदारोळ माजविला, असा दावा त्यांनी केला.
वक्तव्यांची मोडतोड करून त्याच्या आधारे अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसचा मी निषेध करतो
गृहमंत्री शाह यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, याआधीदेखील काँग्रेसने माझ्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. वक्तव्यांची मोडतोड करून त्याच्या आधारे अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसचा मी निषेध करतो; पण काँग्रेस या साऱ्या गोष्टी का करत आहे? एनडीए सरकारने राज्यघटनेचे कसे रक्षण केले, हे भाजपच्या नेत्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले होते. तसेच काँग्रेस हा पक्ष डॉ. आंबेडकर, राज्यघटना, राखीव जागा यांच्या विरोधात कसा उभा ठाकला आहे, याचे दाखलेही भाजप नेत्यांनी संसदेत बोलताना दिले. त्यामुळेच काँग्रेसने आता माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना आनंद होणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे; पण त्यामुळे खरगे यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही शाह म्हणाले.
अमित शाह यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही काँग्रेसने अपमान केला आहे. देशात आणीबाणी लागू करून राज्यघटनेच्या तत्त्वांचा या पक्षाने भंग केला आहे. त्या साऱ्या गोष्टींची आता पुन्हा चर्चा झाल्याने काँग्रेसने आपली जुनी खेळी केली आहे. त्यांनी गोष्टींचा विपर्यास करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भाजप डॉ. आंबेडकर यांचा कधीही अपमान करणार नाही, असेही ते म्हणाले.
विधानसभेत पडसाद : अमित शाह यांच्या विधानाचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. विधान परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल, तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी विरोधकांना सुनावले. संविधानामुळेच हे लोक मंत्री होऊ शकले, यांना संविधानाची इतकी अडचण का होते, असा प्रश्न काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत केला.
हे त्यांच्या जुन्या मानसिकतेचेच लक्षण: प्रकाश आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितीवेळी जनसंघाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध होता. आताही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे. त्यामुळे मंगळवारी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकरांविषयी केलेले वक्तव्य हे त्यांच्या जुन्या मानसिकतेचेच लक्षण आहे. त्यात नवीन काहीच नाही. त्यावेळी त्यांचे असलेले नियोजन अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही, त्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
गृहमंत्री अमित शाहांनी संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या काळ्या इतिहासाची पोलखोल केली आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष स्तब्ध आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाचा अपमान देश कदापिही सहन करू शकत नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी. - राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते