नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले असून, त्यात सरकार १६ नवीन विधेयके आणि अनुदानाच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर १७ बैठकांच्या या सत्रात विरोधी पक्षांनी महागाई, बेरोजगारी, चीनच्या सीमेवरील परिस्थिती, कॉलेजियमचे विषय आणि केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध यासारखे मुद्दे उपस्थित करून चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची मागणी केली आहे.
मुलायमसिंह यादव, इतर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजलीविद्यमान खासदार आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव आणि अलीकडच्या काही महिन्यांत निधन झालेल्या आठ माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर लोकसभेचे कामकाज बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधी पक्षनेत्यांची रणनीतीकाँग्रेससह विरोधी पक्षांनी बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अवलंबल्या जाणाऱ्या रणनीतीवर चर्चा केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या बैठकीला द्रमुकचे टीआर बाळू, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि इतर अनेक विरोधी नेते उपस्थित होते. संसद भवनातील खर्गे यांच्या दालनात ही बैठक झाली.
निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे यासह १६ नवीन विधेयके या अधिवेशनात मांडण्याची सरकारची योजना आहे. या कालावधीत सादर करण्यात येणाऱ्या विधेयकांच्या यादीमध्ये जुने अनुदान (नियमन) विधेयक, वन (संवर्धन) दुरुस्ती विधेयक, किनारी जलसंवर्धन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक इत्यादींचाही समावेश आहे.