चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक लोकसभेत सोमवारी मांडले जाऊ शकले नाही. ऐनवेळी विषयतालिकेतून हा विषय काढून टाकण्यात आला. विधेयक आता कधी मांडले जाईल हे सरकारने स्पष्ट केले नसले, तरी आज मंगळवारी ते मांडले जाण्याची शक्यता आहे.
हे विधेयक मांडले गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविले जाऊ शकते. राज्यघटनेतील १२९व्या दुरुस्तीचे हे विधेयक कायदा मंत्री राम मेघवाल लोकसभेत मांडतील, अशी शक्यता आहे. विविध पक्षांच्या सदस्य संख्येनुसार संयुक्त समिती नेमली जाईल. समितीचे अध्यक्षपद भाजपकडे असेल. याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार हे विधेयक मांडले जात आहे. देशभर लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ डिसेंबर रोजी या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली होती.
‘राज्यसभेत सचिनची सेंच्युरी!’
राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे लक्ष वेधून घेताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीचा उल्लेख केला. सभापतींना उद्देशून खरगे म्हणाले, ‘आपण माझ्याकडे पाहत नाहीत आणि ऐकतही नाहीत.’
यावर अध्यक्ष धनखड स्मितहास्य करत म्हणाले, ‘९९ टक्के मी तुम्हालाच पाहत आहे.’ खरगे म्हणाले, ‘पण हा १ टक्का खूप महत्त्वाचा आहे. सचिन तेंडुलकरने १० किंवा १२ वेळा ९९ धावा केल्या पण शतक करू शकला नाही. म्हणूनच मी विनंती करतो कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे.’
तर, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचा उपयोग घटनेची निर्मिती करण्यासाठी केला. मात्र, सत्ताधारी पक्ष देशवासीयांची दिशाभूल करीत आहे, असे मुकुल वासनिक म्हणाले.
भारताचे संविधान जगात सर्वोत्तम : पटेल
जगाला हेवा वाटावा, असे भारताचे संविधान असून याचा आपण सर्वांना अभिमान हवा, असे प्रतिपादन अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत बोलताना केले. अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलांना साठच्या दशकात मतदानाचा अधिकार देण्यात आला. याउलट भारताने घटना स्वीकारली तेव्हापासूनच महिलांना मतदानाचा अधिकार दिला, असे पटेल यांनी सांगितले.
एका परिवारासाठी काँग्रेसने केल्या घटनादुरुस्त्या : अर्थमंत्री
काँग्रेसने एका परिवाराला व त्यांच्या राजवटीला मदत करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्त्या केल्या, असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी राज्यसभेत केला. काँग्रेस पक्ष महिलाविरोधी आहे. महिलांना राखीव जागा देण्यासंदर्भातील विधेयक काँग्रेस सत्तेवर असताना मंजूर झाले नाही. काँग्रेस सरकारांच्या आर्थिक धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली नाही, असे त्या म्हणाल्या.