लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सध्या देशात २१ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत. दिल्लीत सर्वांत जास्त आठ विद्यापीठे नकली असून, नागपुरात एक विद्यापीठ बनावट आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी ही माहिती लोकसभेत दिली.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रधान यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून बनावट विद्यापीठांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशात चार, तर आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठे नकली आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि पुडुचेरी या राज्यांत प्रत्येकी एक नकली विद्यापीठ आहे. नागपूरमधील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचे नावही बनावट विद्यापीठांच्या यादीत असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
यादी सोशल मीडियावर प्रसारित करावी
देशात २१ बोगस विद्यापीठे असून त्यांची यादी सर्व खासदारांनी सोशल मीडियावर प्रसारित करावी. त्यामुळे या विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल असे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी आवाहन केले आहे. बोगस विद्यापीठे बंद करण्यासाठी कारवाई करण्यात यावी अशी सूचना सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना केली आहे.
समाधान पोर्टलवर ८५ हजार प्रकरणे प्रलंबित
उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एमएसएमईचे ८५ हजार प्रकरणे समाधान पोर्टलवर प्रलंबित असून, २६८७६ कोटी रुपयांचे पेमेंट अडकले असल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.
मुंबई उपनगरात एम्स हवे
उत्तर-पश्चिम मुंबईहून शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबई उपनगरात एम्स हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी लोकसभेत केली. ते म्हणाले की, मुंबईमध्ये अनेक मोठे हॉस्पिटल आहेत. मात्र, गोरगरिबांना या रुग्णालयांचा खर्च परवडणारा. कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात, मुंबई उपनगरात एम्स हॉस्पिटल सुरू करण्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे ते म्हणाले.
किती विद्यापीठांना टाळे२०१४-२०२४ १२ २००४-२०१४ ०५