नवी दिल्ली : विरोधकांनी केलेल्या चौफेर टीकेनंतर केंद्र सरकारने आज अखेर संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुहुर्त काढला. संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी 14 डिसेंबरला होणा-या दुस-या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाच्या एक दिवसानंतर अधिवेशन सुरू होणार आहे.
द हिंदूच्या वृत्तानुसार, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) ने शुक्रवारी पुन्हा बैठक घेऊन अधिवेशनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब केलं. 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत अधिवेशन होणार असून, अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी केले आहे. अधिवेशनाला सर्व खासदारांची 100 टक्के उपस्थिती असेल, अशी आशाही त्यांनी वर्तवली.
एकूण 14 दिवस संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालणार असून लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा एकदा कामकाजासाठी खुली होणार आहेत. या अधिवेशनात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीचे प्रकरण, घाईने लादलेला जीएसटी, नोटबंदीच्या वर्षापूर्तीनंतरही मंदावलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आदी विविध प्रश्नांवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे.