नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या हजेरीचा उल्लेख करत सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देणार होतो. मंगळवारी लोकसभेत काँग्रेसचे खासदार के.सुरेश हे राहुल गांधी यांच्या सीटवरुन बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी एलईडी स्क्रीनवर राहुल गांधी यांचे नाव पाहून लोकसभा अध्यक्षांनी के. सुरेश यांना त्यांच्या जागेवर जाण्याची सूचना केली. कारण राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते अन् त्यांचे नाव स्क्रीनवर दिसत होते.
यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, तुमची सीट रिक्त दाखवत आहे. तुम्ही ज्या सीटवरुन बोलत आहात ती राहुल गांधी यांची सीट आहे. राहुल गांधी आज सुट्टीवर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. यावेळी भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी यांनी या घटनेवर भाष्य करताना सदस्यांनी त्यांच्या जागेवरुन बोलावं अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली. कारण आपल्याला संपूर्ण देश बघत आहे, त्यामुळे टीव्ही स्क्रीनवर आपलं नावं चुकीचं जावू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोमवारपासून राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊनही उपस्थित दिसले नाहीत.
तसेच राहुल गांधी यांचं नाव प्रश्नोत्तराच्या पत्रिकेत छापील होतं. ते जर उपस्थित असते तर त्यांना बोलण्याची संधी द्यायची होती असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. लोकसभा कार्यक्रमानुसार २८ नंबरवर राहुल गांधी यांचा प्रश्न छापील होता. केरळमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनासंदर्भात ते प्रश्न विचारणार होते.
दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. या ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना राहुल यांनी उजाळा दिला आहे. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती. भारतला सशक्त रुप देणाऱ्या अशा महिलेला शतश: अभिवादन आहे असं त्यांनी म्हटलं.