नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विजयासह सत्ता स्थापन केली होती. मात्र, पहिल्यांदाच एनडीएतील गेल्या 30 वर्षांपासूनचा एकमेव हिंदुत्ववादी मित्रपक्ष शिवसेना बाहेर पडला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आज हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाची वैशिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला. हे अधिवेशन यंदाचे शेवटचे आहे. तसेच महत्वाचेही आहे. कारण राज्यसभेचे हे 250 वे अधिवेशन आहे. तसेच आपल्या संविधानाला येत्या 26 सारखेला 70 वर्षे पूर्ण होत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांती मी सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची संधी दिली आहे. गेल्या वेळचे अधिवेशन त्यांच्या सहकार्यामुळे चांगले झालेय. यावेळीही सर्व खासदारांनी चांगली चर्चा, विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे, असेही मोदी म्हणाले.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला अधिक अधिकार यासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत झाली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे विधेयकही संमत केले होते. नागरिकत्व विधेयक संमत करून घेण्याबरोबरच दोन वटहुकुमांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकार या वेळी प्रयत्नशील असेल. नव्या व देशी उत्पादक कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात कपात करणे तसेच ई-सिगारेट व सदृश उत्पादनांच्या विक्री, उत्पादन व साठवणुकीवर बंदी घालणे असे दोन वटहुकूम सप्टेंबर महिन्यात जारी करण्यात आले होते.
यापैकी काही विधेयकांची संशोधन विधेयके संमत करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करणार आहेत. मात्र, राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने हे अधिवेशन तेवढेच गाजणार आहे. त्यातच शिवसेना एनडीएच्या बाजुने मतदान करते की विरोधात हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.