नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन विधायक चर्चा आणि नवीन सूचनांमुळे फलदायी ठरून देशाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. अधिवेशनात २५ प्रलंबित आणि १४ नवी विधेयके सादर होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे. यात तीन वेळा तलाक प्रकरणात मुस्लिम महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार देणाºया विधेयकाचाही समावेश आहे.मोदी म्हणाले की, गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देशाला पुढे नेण्याची गरज असून, संसदेचे हिवाळी अधिवेशन त्यासाठी सकारात्मकदृष्ट्या वापरले गेले पाहिजे, ही राजकीय नेत्यांची स्पष्ट भूमिका होती. देशाच्या विकासाला हे अधिवेशन हातभार लावील, अशी आशा मला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेले हे अधिवेशन पाच जानेवारीपर्यंत चालेल.लोकसभेचे कामकाज स्थगित- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे कामकाज तीन विद्यमान व सात माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून स्थगित झाले.ते सोमवारी सुरू होईल. या सदस्यांचे निधन आंतर अधिवेशनादरम्यान झाले. सभागृह सुरू होताच गुरुदासपूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे सुनील कुमार जाखड यांनी पंजाबीतून शपथ घेतली.जाखड यांचे मोदी यांनी हस्तांदोलन करून अभिनंदन केले, तर जाखड यांनी त्यांना नमस्कार केला. नंतर मोदी यांनी नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली.त्यात धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन व पीयूष गोयल यांचा समावेश होता. तीन सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या फेररचनेत या तिघांना कॅबिनेटचा दर्जा दिला गेला.
संसदेचे हिवाळी अधिवेशन फलदायी ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 1:12 AM