नवी दिल्ली : यंदाचा हिवाळा उत्तर भारतात जास्तच कडक असेल व वारंवार थंडीची लाट येईल, अशी अपेक्षा भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी व्यक्त केली.
डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यातील हिवाळ्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त करताना म्हटले की, उत्तर आणि मध्य भारतात किमान तापमान हे सामान्य तापमानाच्या खाली असेल. यंदाचा हिवाळा हा उत्तर भारतात कडक असण्याची शक्यता महापात्रा यांनी बोलून दाखवली. उत्तर भारतात रात्रीचे तापमान हे सामान्य तापमानाच्या खाली असेल तर दिवसाचे तापमान हे सामान्य तापमानाच्या वर अपेक्षित आहे.
उत्तर भारतातील पठारी प्रदेशांत दरवर्षी थंडीच्या लाटेत अनेक लोकांचा मृत्यू होतो. गेल्या महिन्यात महापात्रा यांंनी वेबिनारमध्ये यंदाचा हिवाळा हा ला निनाचा प्रभाव असल्यामुळे अधिक कडक असू शकतो, असे संकेत दिले होते. कडक हिवाळ्याचे ताजे भाकीत हे नेमस्त ला नीना परिस्थिती सूचित करते व ही परिस्थिती हिवाळ्याच्या शेवटापर्यंत कायम राहील, असे दिसते, असेही महापात्रा म्हणाले.२०१६ पासून भारतीय हवामान विभाग हिवाळ्याचे भाकीत करत आला आहे. देशात यंदाचा हिवाळा हा कडक असेल, असे भाकीत हवामान विभागाने करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.