नवी दिल्ली - राजकारणात टीकेपलीकडे काही संबंध जोपसले जातात. मी घरातलाच आहे असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीशरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. या नेत्यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच अजित पवार-शरद पवारांची भेट झाली. त्यामुळे या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस, उद्या काकीचा वाढदिवस आहे त्यामुळे या दोघांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो. दर्शन घेतले, चहापाणी झालं. त्यासोबत इतर गोष्टींवर चर्चा झाली. परभणीला असं का घडलं अशा इतर बाबींवर बोललो. संसदेचे कामकाज, मंत्रिमंडळ विस्तार, अधिवेशन याबाबतही चर्चा झाली. राजकीय चर्चा होत असतात. आज १२ डिसेंबरला साहेबांचा वाढदिवस आहे, त्यासाठी सगळे जण त्यांना भेटून शुभेच्छा देतात, आशीर्वाद घेतात. आम्हीही त्यासाठी आलो आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय महाराष्ट्रात आम्ही तिघांनी शपथ घेतली आहे. बाकीचे मंत्रिमंडळ कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. १६ तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनात विधेयके आहेत इतर कामकाज आहे. विभागाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्र्यांची गरज असते. बहुतेक १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मी घरातलाच आहे. राजकारणात टीकाटिप्पणी होते पण काही वेगळे संबंधही असतात. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचे हे शिकवले आहे. त्यापद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटीवर सूचक विधान केले आहे.
दरम्यान, शरद पवार हे वंदनीय आहेत. दरवर्षी त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यानिमित्ताने आज आम्ही इथं आलो होतो असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं तर दरवर्षी आम्ही साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतो, आजही आलो. संजय राऊतांना आमच्या भेटीवर बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे असा टोला सुनील तटकरे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.