Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान बुधवारी (दि.११) काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
लोकसभा निवडणुकीत आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे अनेक नेते आतापर्यंत तुरुंगात गेले असते, असे मल्लिकार्जुन खरगे अनंतनागमधील प्रचारसभेत म्हणाले. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांच्या या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे हे विधान काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपने म्हटले आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?भाजपचे लोक ४०० पार, ४०० पार म्हणायचे. तुमचा ४०० पार कुठे गेला? त्यांना केवळ २४० जागा मिळाल्या. आम्ही आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर ते तुरुंगात गेले असते. ते तुरुंगात राहण्यास पात्र आहेत, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. दरम्याान, 'अबकी बार ४०० पार' ही भाजपची लोकसभा निवडणुकीत घोषणा होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या, तर काँग्रेससह इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या होत्या.
भाजपचे जोरदार प्रत्युत्तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, हे काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे स्पष्ट उदाहरण आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते. तसेच, काँग्रेसला तो वारसा पुढे चालवायचा आहे, असे म्हणत शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, ती २१ महिने होती.