नवी दिल्ली/मुंबई- चाळीस आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आता आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे अनेक खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आते. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी संपर्कातील खासदारांबाबत मोठं विधान केलं आहे.
किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत, असं विचारलं असता, एकनाथ शिंदे म्हणाले की, मी शिवसेनेच्या कुठल्याही खासदाराला भेटलेलो नाही. संपर्काचं म्हणाल तर मी मंत्री असल्याने खासदार रोजच संपर्कात असतात. यावेळी देवेंद्र फणडवीस यांनी शिंदेंच्या संपर्कात नक्कीच एक खासदार आहे, तो म्हणजे श्रीकांत शिंदे, असं विधान केलं. तर एकनाथ शिंदे याबाबत अधिक स्पष्टता देताना म्हणाले की, कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. अनेक जण भेटीला येत असतात. तसेच जी चर्चा सुरू आहे. त्याप्रमाणे खासदारांची कुठली बैठक झाली याबाबत मला काही माहिती नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.