Noida Single Mom Story: जगात आईपेक्षा सामर्थ्यवान आणि प्रेरणास्थान कुणीच नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही. नोएडातील अशाच एका जिद्दी आईची गोष्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या आईची गोष्ट एका चित्रपटाची कहाणी वाटेल, पण ती खरी आहे. चंचल शर्मा या आपलं चिमुकलं मूल मांडीवर ठेवून संघर्षमय जीवनाला हिमतीनं तोंड देत आहेत. त्यांच्या ई-रिक्षा जशी रस्त्यावर फिरु लागते तसं लोकांच्या नजरा खिळतात आणि सर्वांच्या नजरेत एक हिमतीची दाद दिसते.
नोएडातील या 'सिंगल मॉम'नं आपल्या मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी कोणतीही कसर ठेवायची नाही या उद्देशानं मेहनतीचा विडा उचलला आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या ई-रिक्षा ड्राइव्हिंगमध्ये ती आपला ठसा उमटवत आहे. रस्त्यात चंचल शर्मा दिसल्या आणि त्यांच्याकडे लक्ष जाणार असं होणार नाही. खांद्यावर बांधलेल्या बेबी बेल्टमध्ये चिमुकलं मूल आणि हाती रिक्षाचं स्टेअरिंग...जणून आयुष्यातील सर्व संघर्ष जिंकण्याच्या जिद्दीनं त्या पुढे जाताना दिसतात.
चंचल यांचा दिवस अगदी सकाळी साडेसहा वाजता सुरू होतो. रिक्षा बाहेर काढणं आणि रस्त्यावर आणून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी त्या कामाला लागतात. दुपारी त्या बाळाला आंघोळ करायला घरी आणतात. मग दुपारच्या जेवणानंतर पुन्हा त्या रिक्षा चालवण्यासाठी जातात. जर मुलाला रस्त्यात भूक लागली तर त्याच्यासाठी दूधाची एक बाटली त्या आठवणीनं सोबत घेतात. सेक्टर 62 मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल आणि सेक्टर 59 मधील लेबर चौक दरम्यान चंचल त्यांची ई-रिक्षा चालवतात. त्यांची ई-रिक्षा सुमारे ६.५ किमी परिसरात धावते.
नोएडा येथील 27 वर्षीय चंचला शर्मांचीही वेदना ही देशातील लाखो नोकरदारांसारखीच आहे. जर एखाद्या महिलेला आपल्या मुलाला डेकेअर आणि पाळणाघरात ठेवणं परवडत नसेल तर तिला काम करताना खूप त्रास सहन करावा लागतो. गेल्या वर्षी मुलगा अंकुशच्या जन्मानंतर दीड महिन्यानंतर चंचल यांनी नोकरीचा शोध सुरू केला. त्यामुळे त्यांनाही याच समस्येचा सामना करावा लागला. नंतर त्यांनी ई-रिक्षा घेतली. मुलाला सोबत घेऊन काम करू शकतो असं हे काम त्यांना वाटलं आणि रिक्षा चालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुलाला वेळ द्यायचा आहे पण तो आपल्याकडे नाही याची आजही चंचल यांना खंत आहे.
सर्वांनी केलं कौतुकचंचल यांनी मुख्यतः पुरुषांचं वर्चस्व असलेला व्यवसाय निवडला आहे. असं असूनही त्या आपल्या कामासाठी समर्पित आहेत. त्या ज्या मार्गावर ई-रिक्षा चालवत आहे त्या मार्गावर फक्त त्या एकट्याच महिला चालक आहेत. यानंतरही त्या आपलं काम जिद्दीनं करत आहेत. लहान मुलाला खांद्यावर बांधून ई-रिक्षा चालवणारी चंचला नकळत सर्वांचं लक्ष वेधून घेतात. माझ्या रिक्षात बसलेले प्रवासी माझं तोंडभरुन कौतुक करतात, असं त्या प्रांजळपणे सांगतात. महिला प्रवाशांनाही माझी ई-रिक्षा आवडते, असंही त्या म्हणाल्या.