नवी दिल्ली- मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडचणी आणणाऱ्या चीनला आता धडा शिकवावा, असा दबाव मोदी सरकारवर वाढत आहे. भारतातल्या नागरिकांनीही चीनविरोधात आक्रमक कारवाईची मागणी केली आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचा(SJM)नं मोदी सरकारकडून चीनला देण्यात आलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याची मागणी केली आहे.स्वदेशी जागरण मंचा(SJM)च्या अश्विनी महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात चीनला भारताकडून देण्यात आलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंवर भारतात फारच कमी टेरिफ लावला जातो. आता चीनला धडा शिकवण्यासाठी आयात वस्तूंवर भारतानं तात्काळ टॅरिफ वाढवला पाहिजे.महाजन म्हणाले, चीनकडून भारतात 76 अब्ज डॉलर म्हणजेच 5.27 लाख डॉलरच सामान पाठवलं जातं. तर भारताकडून चीनला निर्यात होणाऱ्या वस्तूंची संख्या फार कमी आहे. भारताकडून चीनच्या आयात वस्तूंवर फारच कमी टॅरिफ आकारला जातो, त्यामुळे भारताला व्यापारात नुकसान होतं. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून संयुक्त राष्ट्रात मसूद अजहरला वाचवणाऱ्या चीनवर दबाव वाढत आहे. भारतानंही चीनविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, ही जनतेची इच्छा आहे.अनेक संघटनांनी भारतानं चीनविरोधात कडक भूमिका घ्यावी, असं म्हटलं आहे. भारतानं चीनकडून येणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवलं पाहिजे. अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या अनेक काळापासून तणाव सुरू आहे. अमेरिकेनंही चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ शुल्क वाढवलं आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानं अमेरिकेसारखं शुल्क चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर आकारलं पाहिजे.
चीनलाही इंगा दाखवा, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घ्या; मोदी सरकारवर दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:49 PM