तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोईत्रा ह्या अदानींबाबत संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, महुआ मोइत्रांचे माजी मित्र आणि सुप्रीम कोर्टातील वकील जय अनंत देहाद्राई यांनी एक गंभीर आरोप केला आहे. सीबीआयकडे दिलेली तक्रार आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी आपल्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यत आला, असं त्यांनी म्हटलं आहे. देहाद्राई यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिलं की, काल दुपारी माझ्यावर हेन्रीच्या बदल्यात निशिकांत दुबे यांना देण्यात आलेली सीबीआय तक्रार आणि पत्र मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मी असं करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तसेच मी याची माहिती सीबीआयला देणार आहे.
देहाद्राई यांनी सांगितले की, मेसेंजर पूर्णपणे निर्दोष आहे. मात्र तुम्हाला त्याच्याबाबत सर्व काही सांगणार आहे. महुआ मोइत्रा आणि देहाद्राई यांच्यामध्ये त्यांचा पाळीव कुत्रा हेन्रीवरून वाद सुरू आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये मोईत्रा यांनी कथित गुन्हेगारी अतिक्रमण, चोरी, अश्लील संदेश आणि गैदवर्तनावरून देहाद्राईंविरोधात पोलिसांकडे अनेक तक्रारी नोंदवल्या आहेत. यादरम्यान, भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले की, त्यांना वकील देहाद्राई यांचं एक पत्र मिळालं आहे. त्यामधून त्यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हीरानंदानी यांच्याकडून रोख आणि भेटवस्तूंच्या रूपात लाच घेतल्याचे काही पुरावे सादर केले आहेत.
तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी अदानी समुहावर सातत्याने आरोप केले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाविरोधात महूआ मोईत्रा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, महुआ मोइत्रा यांनी या वादासाठी एक बनावट पदवी असलेला खासदार आणि त्यांचा एक माजी मित्र जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा वाद अधिकच वाढला होता. १७ ऑक्टोबर रोजी दिल्ली हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करताना महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. तसेच आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हे आरोप करण्यात आले, असा दावा महुआ मोइत्रा यांनी केला.
या याचिकेमधून दुबे, देहाद्राई आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया हाऊस यांना आपल्याविरोधात कुठलीही बनावट आणि अपमानकारक सामुग्री प्रसारित करण्यास किंवा प्रकाशित करण्यास मनाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोमवारी ट्विटरवरील एका पोस्टवर महुआ मोईत्रा यांनी अदानी समुहाचं एक पत्रक शेअर केलं होतं. त्यामध्ये देहाद्राईंचं नाव होतं. रॉटवेलर हेन्री हा महुआ मोईत्रा आणि देहाद्राई यांच्यातील वादामध्ये प्रमुख पात्र म्हणून समोर आलं आहे. या वादानं आता राजकीय वादाच रूप धारण केलं आहं. कायदेशीर नोटिशीनुसार देहाद्राई हे हेन्रीला घेऊन गेले होते. मात्र नंतर त्यांनी तो परत केला होता.