नवी दिल्ली - केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने आपल्या साडेतीनवर्षाच्या सत्ताकाळात तब्बल 3,755 कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केले आहेत. माहिती अधिकारातंर्गत शुक्रवारी ही माहिती उघड झाली. एप्रिल 2014 ते ऑक्टोंबर 2017 या कालावधीत इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया आणि अन्य प्रसिद्धीवर 37,54,06,23,616 इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आरटीआयतंर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक मीडियामधील जाहीरातीवर 1,656 कोटी रुपये खर्च केले. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जाहीरातीमध्ये कम्युनिटी रेडिओ, डिजिटल सिनेमा, दूरदर्शन, इंटरनेट, एसएमएस आणि टीव्हीचा समावेश आहे. प्रिंट मीडियामधील जाहीरातीवर सरकारने 1,698 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम खर्च केली. जाहीरात फलक, पोस्टर्स, बुकलेट, होर्डींग, कॅलेंडरवरील जाहीरातीसाठी सरकारने 399 कोटी रुपये खर्च केले आहेत.
आरटीआय अंतर्गत माहिती देताना सरकारने खर्च कसा केला ते ही स्पष्ट केले आहे. 1 जून 2014 ते 31 मार्च 2015 या कालावधीत 448 कोटी रुपये, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या कालावधीत प्रत्येकी 542 कोटी रुपये खर्च केले. 1 एप्रिल 2016 ते 31 ऑगस्ट 2016 या कालावधीत 120 कोटी रुपये खर्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेडिओवरील मन कि बात कार्यक्रमाच्या वर्तमानपत्रातील जाहीरातीसाठी साडेआठ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे 2015 साली आरटीआयमधून समोर आले होते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन कि बात हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारीत होतो.