- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा मोठा डंका पिटण्याच्या भाजपाच्या योजनेवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, वाढती बेरोजगारी, न पाळलेली आश्वासने आणि अनेक बाबतीत आलेले घोर अपयश याखेरीज मोदी सरकारकडे दाखविण्यासारखे आहे काय, मग ते नेमका कशाचा जल्लोष करीत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. सरकारने तीन वर्षांत केवळ लोकांचा विश्वासघात केला आहे, असे ते म्हणाले. राहुल टिष्ट्वटमध्ये म्हणतात, तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे. राहुल यांनी रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर यापूर्वीही सरकारवर हल्ला केला आहे. सरकारला एक वर्षात रोजगाराच्या एक कोटी संधी निर्माण करण्याचे आपले आश्वासन पाळता आलेले नाही. सरकारकडे दूरदृष्टी नसल्यामुळे तरुण वर्गात निराशा पसरली आहे, असेही ते म्हणाले. भाजपा केंद्रात आपल्या सरकारचे तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर मोदी उत्सवाचे आयोजन करीत आहे. तथापि, येथे मोदी म्हणजे पंतप्रधानांचे नाव नाही तर मेकिंग आॅफ डेव्हलपिंग इंडिया याचे ते लघुरूप आहे. या उत्सवाची सुरुवात २६ मे रोजी गुवाहाटी येथून होणार असून, १५ जून रोजी त्याची सांगता होईल. हा उत्सव देशभर आयोजित करण्यात येणार असून, यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात किमान एका सोहळ्याचे आयोजन होणार आहे.हा कसला आनंदोत्सव? तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे.