नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा आवर्जून सल्ला दिला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी मास्क न लावल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असतानाच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक आमदार आणि मंत्री मंगळवारी मास्क न लावता दाखल झाले.
सांस्कृतीक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) देखील मास्क न लावता विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यांना यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "मी हनुमान चालीसाचे पठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा माझा कोरोनापासून बचाव आहे" असं म्हटलं आहे. तसेच मी गळ्यात गमछा ठेवते, जर कोणी जवळ आलं तर मी तो तोंडावर ठेवते. जगात ज्याला उत्तम मार्गाने जगायचे आहे त्याने वैदिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्याला कुठला आजार स्पर्शही करू शकत नाही" असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
"मास्क लावल्याने मला घाबरल्यासारखं होतं"
बसपाच्या आमदार रमाबाई परिहार याही मास्क न लावता विधानसभेत दाखल झाल्या. "ज्याच्यात धैर्य आहे, केवळ तोच काहीतरी करू शकतो. मास्क न लावल्याबद्दल जो काही दंड असेल तो मी भरेन. मास्क लावल्याने मला घाबरल्यासारखं होतं" असं रमाबाई परिहार म्हणाल्या. लोकं रस्त्यावर चाट भजी खायला जातात. विनाकारण रस्त्यावर जाण्याची गरज नाही. यामुळेच रुग्णवाढ झाली आहे असं देखील ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला; 15 विद्यार्थी पॉझिटिव्ह, पालकांची वाढली चिंता
शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून 15 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. पंजाबच्या लुधियानात असलेल्या गावातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुधियानाच्या चौंटा गावातील एका शाळेतील दोन शिक्षक आणि 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घावा लागला आहे. लुधियानाच्या उपायुक्तांनी तातडीने ही शाळा दोन मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच स्थानिक प्रशासनाने कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
तुम्हीही चष्मा लावता? मग तीनपट कमी आहे कोरोनाचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
कोरोनाचाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींच्या यादीत आता चष्माचा देखील समावेश झाला आहे. कोरोनाच्या संकटात चष्मादेखील व्हायरसविरोधातील लढ्यात मोठी भूमिका बजावत असल्याचं दिसून आलं आहे. चष्मा घालणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका हा इतरांपेक्षा तीनपट कमी असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून हा खुलासा करण्यात आला आहे. चष्मा आणि कोरोना याबाबत संशोधकांनी अभ्यास केला. जे लोक दिवसातून किमान आठ तास चष्मा लावतात त्यांना कोरोना होण्याचा धोका हा अत्यंत कमी आहे. त्यामुळेच इतरांच्या तुलनेत ते थोडे सुरक्षित आहेत. रिपोर्टनुसार, चष्मा न घालणाऱ्यांपेक्षा चष्मा घालणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचा धोका दोन ते तीन पटीने कमी होता असं रिसर्चमधून स्पष्ट करण्यात आलं. यापूर्वी डॉक्टरांनी ज्या व्यक्ती कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी चष्मा वापरण्याचा सल्ला दिला होता.