सहारनपूर - इस्लामिक शिक्षण संस्था दारूल उलूम देवबंदनं नवीन फतवा जारी केला आहे. मोबाइलवर कोणत्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं संस्थेकडून गुन्हा ठरवण्यात आले आहे. संस्थेच्या फतवा विभागातील एका व्यक्तीनं मुफ्ती ए कराम यांना माहिती दिली होती की, मोबाइलवर आवाज रेकॉर्ड करणं सर्वसामान्य गोष्ट आहे आणि कित्येक मोबाइल सेटमध्ये ऑटो रेकॉर्डिंगचीदेखील व्यवस्था असते. आपला आवाज रेकॉर्ड होतोय ही बाब संवाद साधणाऱ्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही.
दारूल उलूमच्या फतवा विभागाच्या खंडपीठातील मुफ्ती ए कराम यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, इस्लाम धर्मात आपापसातील संभाषण ही त्यांची खासगी बाब असते, असे मानले जाते. इस्लाममध्ये अशा संभाषणांचे रेकॉर्डिंग करुन अन्य लोकांना ऐकवणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे चुकीचे मानले जाते. त्यामुळे परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं उचित नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वीही असे अनेक फतवे दारूल उलूम देवबंदनं जारी केले आहेत. कोणत्याही कार्यक्रमात सामूहिकरित्या पुरुष आणि महिलांनी एकत्र उभे राहून जेवणं इस्लामविरोधी असल्याचे संस्थेनं म्हटले आहे. कोणत्याही कार्यक्रमात खाणे-पिण्याच्या सामूहिक व्यवस्था तसेच पुरुष-स्त्रियांनी एकत्र उभे राहून खाण्याच्या पद्धतीवर देवबंदच्याच एका व्यक्तीनं इफता विभागाकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना देवबंदनं म्हटलं की, पुरुष आणि महिलांनी सामूहिकरित्या एकत्रित जेवणं अवैधच नाही तर गुन्हादेखील आहे.