हैदराबाद- भारतातल्या अनेक खेड्यांत आज ब-यापैकी सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. रस्ता, वीज खेडोपाड्यात घरोघरी पोहोचल्याचं सरकार वारंवार सांगत असतं. परंतु देशातील काही राज्यांत अशीही काही गावं आहेत, तिकडे अद्यापही रस्ताच नाही. आंध्र प्रदेश विजयनगरम जिल्ह्यातील एका गावातही एवढी वर्षं स्वातंत्र्य मिळून रस्ता झालेला नाही. त्यामुळे गावक-यांना जिल्ह्यापर्यंत येण्यासाठी मोठं अंतर पार करावं लागतं.अशाच एका गावात रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला विजयनगरम या जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी चक्क साडीत गुंडाळून 12 किलोमीटरपर्यंत गावक-यांना पायपीट करावी लागली आहे. विशेष म्हणजे महिलेनं रस्त्यामध्येच मुलाला जन्म दिला. परंतु अँब्युलन्स पोहोचण्याच्या आधीच बाळाचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेश विजयनगरम जिल्ह्यात 22 वर्षीय जिंदम्माला प्रसव कळा सुरू झाल्या. जिंदम्माची परिस्थिती पाहता तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. जिंदम्माचं घर घनदाट जंगलात आहे. त्यामुळे तिथे अँब्युलन्स पोहोचू शकली नाही. त्यानंतर जिंदम्मा हिला गावक-यांनी साडीत गुंडाळून 12 किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. परंतु जिंदम्मा हिला वाटेतच जोरजोरात प्रसव कळा होऊ लागल्या. प्रसव कळा सहन न झाल्यानं जिंदम्मा हिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला.परंतु अँब्युलन्स येण्याआधीच बाळाचा मृत्यू झाला. खरं तर स्वातंत्र्याला एवढी वर्षं होऊनही कोंडथमारा गावातून डुग्गेरुदरम्यान अद्यापही रस्ता नाही. जिंदम्मा यांना पार्वतीपूरम आईटीडीए रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सध्या त्या गर्भवती महिलेला प्लेसेंटोवर ठेवण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असून, तब्येतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टर एस. एन. ज्योती यांनी सांगितलं आहे.
खेदजनक; गावात रस्ताच नसल्यानं गर्भवतीला 12 किलोमीटरपर्यंत साडीत गुंडाळून नेलं !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 6:01 PM