नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून 'एम्स'मध्ये उपचार घेणारे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भेटण्यासाठी काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी गुपचूप रुग्णालयात पोहोचले आणि त्यांना असं एकाएकी आलेलं पाहून डॉक्टरांसह सगळेच चकित झाले. जवळपास पाऊण तास ते रुग्णालयात होते आणि वाजपेयींच्या तब्येतीबाबत त्यांनी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली.
पंतप्रधान जेव्हा कुठे जातात, तेव्हा त्यांच्या मागे-पुढे गाड्यांची लांबच लांब रांग असते. त्यांच्या कारला एनएसजी कमांडोंचा वेढा असतो. त्यांचा संपूर्ण दौरा ठरलेला असतो आणि सर्व अधिकारी, कर्मचारी त्यांच्या दिमतीला सज्ज असतात. परंतु, रविवारी रात्री कुठलीही सुरक्षा न घेता आणि कुणालाही पूर्वसूचना न देता, सगळ्या सिग्नलला कार थांबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समध्ये पोहोचले. त्यांना समोर पाहून रुग्णालय प्रशासनाचे अधिकारीही अवाक् झाले. अचानक असं काय झालं की थेट पंतप्रधान इतक्या अचानक हॉस्पिटलमध्ये आले, हे कुणालाच कळेना. परंतु, मोदी अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं कळलं आणि सगळ्यांनीच निःश्वास सोडला. वाजपेयींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतर ते निवासस्थानी परतले. ते असे अचानक का आणि कसे गेले, हे मात्र गूढच आहे.
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास बळावल्यानं अटलबिहारी वाजपेयी यांना दोन आठवड्यांपूर्वी एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं बोललं गेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे प्रमुख नेते आणि काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधीही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये जाऊन आले होते. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सध्या तब्येत स्थिर आहे. पण, दोन दिवसांपूर्वी त्यांना काही काळासाठी व्हेटिंलेटरवर ठेवावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर, मोदींची ही एम्स भेट महत्त्वाची मानली जातेय. मोदींआधी, १८ जूनला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या तब्येतीची विचारपूस केली होती.