नवी दिल्ली - विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीचा भडका उडाला आहे. रविवारी तेल कंपन्यांनी घरच्या गॅस सिलेंडरचे दर 15.50 रुपयांनी वाढविले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आजपासून विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 590 रुपयांना मिळणार आहे.
ऑगस्टमध्ये या गॅस सिलेंडरची किंमत 574 रुपये 50 पैसे इतकी होती. दोन महिन्यात किंमतीमध्ये झालेल्या घसरणीनंतर हे दर वाढले आहेत. कोलकातामध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 601 रुपयांऐवजी 616 रुपये 50 पैसे इतके झालेत तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गॅस सिलेंडरचे दर 546 रुपयांवरून 562 रुपये इतके वाढविण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये 590 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता 606 रुपयांना मिळणार आहे.
गेल्या महिन्यात विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. 1 जुलैपासून हे गॅस सिलिंडरचे हे नवे दर लागू करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबूत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. एलपीजी 14.2 किलो किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडरमध्येच ही दरकपात केली होती. मात्र विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढल्याने गृहिणींचे मासिक बजेट कोलमडणार असल्याचं दिसून येत आहे.