ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - एअर इंडियाच्या अधिका-यांनी आपल्याशी गैरवर्तन करत फ्लाईटमधून खेचून बाहेर काढल्याचा आरोप एका अपंग महिलेने लावला आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीत असोसिएट प्रोफेसर असणा-या अनित घई यांच्या सांगण्यानुसार, एअर इंडियाने त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था तर केली नाहीच आणि त्याबद्दल विचारणा केली असता अधिका-यांनी त्यांना विमानाच्या बाहेर काढले. मात्र एअर इंडियाच्या अधिका-यांनी हे आरोप फेटाळून लावत घई यांना व्हील चेअर देण्यात आली होती, असा दावा केला आहे.
काय आहे प्रकरण?
अनिता शुक्रवारी संध्याकाळी एअर इंडियाच्या 'अलायन्स एअर' फ्लाइटने चार सहका-यांसह डेहराडून येथून दिल्लीला परत येत होत्या. विमान इंदिरा गांधी एअरपोर्टवर उतरल्यानंतर अनिता यांनी फ्लाइट कमांडरकडे व्हील चेअरची मागणी केली, मात्र अर्धआ तास उलटून गेल्यावरही व्हील चेअर मिळाली नाही. अनिता यांनी या संदर्भात पुन्हा पुन्हा मागणी केली असता सुरक्षेचे कारण देत त्यांना व्हील चेअर देण्यास नकार देण्यात आला. आणि अखेर तासाभरानंतर अनिता यांना विमानातून खेचून बाहेर काढण्यात आले.
एअर इंडियाच्या अधिका-यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आम्ही आमच्या प्रवाशांची व्यवस्थित काळजी घेतो असे स्पष्ट केले. त्यादिवशी विमान थोड्या लांब अंतरावर उतरवण्यात आल्याने व्हील चेअर आणण्यास वेळ लागला. मात्र अनिता यांनी सांगितल्यानुसार कोणतीही घटना घडलेली नाही, उलट आमच्या कर्मचा-यांनी त्यांना उतरण्यास मदतच केली, असे अधिका-यांनी नमूद केले.