ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मुंबईवरील भीषण अशा २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलोमन हेडलीची सोमवारी मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर साक्ष होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत व्हिडीओ लिंकव्दारे हेडलीची साक्ष नोंदवण्यात येणार आहे अशी माहिती या खटल्याचे विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी दिली.
भारताच्या कायदेशीर इतिहासात प्रथमच एक परदेशी दहशतवादी व्हिडीओ लिंकवरुन पुरावे देणार आहे आणि त्या पुराव्याची नोंद करण्यात येणार आहे. हेडलीची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण राहिल कारण त्यामुळे अजूनही माहित नसलेल्या या कटासंबंधीच्या अनेक गोष्टी उघड होतील असे निकम यांनी सांगितले.
हेडलीकडून मिळणा-या पुराव्याचे महत्व अधोरेखित करताना निकम म्हणाले कि, हेडलीकडून मिळणारे पुरावे दोन कारणांसाठी महत्वपूर्ण आहेत. भारतातील एक दहशतवादी अबू जिंदाल पाकिस्तानात असून त्याच्या विरोधातील खटला प्रलंबित आहे. त्यामुळे हेडलीच्या साक्षीमुळे या खटल्याच्या सुनावणीवर व्यापक परिणाम होणार आहे
तसेच हा कट का रचला ? तसेच या कटामागे कोणकोण आहेत त्यावरही प्रकाश पडणार आहे. २६/११ हल्ल्यापूर्वी हेडली भारतात येऊन संभाव्य हल्ला स्थळांची पाहणी करुन गेला होता. तो आता अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात आहे.