हैदराबाद- सोशल मीडियाचा सध्या सगळेच जण वारेमार वापर करत असल्याने एखादी गोष्ट लपून राहणं फार कठीण झालं आहे. कुठेही घडलेली घटना सोशल मीडियावर आली तर ती काही वेळातच वाऱ्यासारखी पसरते. इंडिगो एअरलाइन्स ही कंपनी सध्या अशाच प्रकारे सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. काही दिवसआधीच इंडिगोच्या कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर इंडिगोने त्याची दखल घेत तीन कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित केलं होतं. आता आणखी एका कारणाने इंडिगो एअरलाइन्स चर्चेत आली आहे. एअर होस्टेसने उचलेल्या पावलामुळे इंडिगो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मद्यपान केलेले व्यक्ती एअर होस्टेसच्या पाया पडताना दिसत आहे. त्या दोघांनी इंडिगोच्या एअर होस्टेसबरोबर गैरवर्तन केल्याने त्या एअर होस्टेसने त्या दोघांना पाया पडून माफी मागायला लावली.
विमान प्रवासात एखाद्या प्रवाशाकडून अशी वागणूक सामान्य आहे. प्रवासादरम्यान व्यवस्थापनादरम्यान एअर होस्टेसकडून अशी वागणूक दुर्लक्षित केली जाते. पण पहिल्यांदाच इंडिगोच्या एअर होस्टेसने दोन मद्यपींना पोलीस पोस्टचा रस्ता दाखवत पाया पडून माफी मागायला लावली. 18 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. 'पूर्ण वाकून माझ्या पाया पड. तरंच मी जाऊ देईल', असं ती एअर होस्टेस त्या दोघांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.