West Bengal Governor : राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्याने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणावरुन तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. कोलकाता राजभवनात तात्पुरती कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेने गुरुवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. महिलेने राज्यपालांवर दोन वेळा विनयभंगाचा आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापलं आहे. यावर आता राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर तृणमूल काँग्रेसने राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांना घेरलं. तृणमूलने पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. यावर आता राज्यपाल आनंदा बोस यांनी भाष्य केलं आहे. “पुढील ग्रेनेड आणि तुमच्या छुप्या गोळ्यांची वाट पाहत आहे. कृपया गोळी चालवा, असे राज्यपाल बोस यांनी म्हटलं आहे. स्वतःला कर्णधार असं म्हणत राज्यपालांनी कर्मचाऱ्यांना राजभवनात आणखी भयंकर षडयंत्र रचले जात असल्याचे म्हटलं आहे.
राज्यपाल बोस यांनी यासंदर्भातील इंग्रजी ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. "राजभवनमधील प्रिय कर्मचाऱ्यांनो, राजकीय पक्षाकडून माझ्यावर वारंवार केल्या जाणाऱ्या सर्व आरोपांचे मी स्वागत करतो. मला वाटते अजून बरेच काही यायचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आणि हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. चारित्र्याची हत्या हा शेवटचा उपाय आहे. या घाणेरड्या कथा रचणाऱ्या लोकांचे चारित्र्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.आता माझ्याकडे माहिती आहे जी खूप महत्वाची आहे. मित्रांनो, आता मला माहिती मिळाली आहे की राजभवनात आणखी एक भयंकर कट रचला गेला आहे. याला जबाबदार असणारे लोक आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे सावधान," असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
"तुमच्या शस्त्रागारातून सर्व शस्त्रे काढा आणि ती माझ्याविरुद्ध वापरा. मी तयार आहे. माफ करा, माझ्या टीकाकारांनो, मी पळून न जाता लढायला शिकलो आहे. पुढील ग्रेनेड आणि तुमच्या लपविलेल्या गोळ्यांची वाट पाहत आहे. कृपया हल्ला करा, मी ते सहन करण्यास तयार आहे. मी फक्त एवढीच ग्वाही देत आहे की 'आय लोराई आमी लोरबो', मी बंगालच्या बंधू-भगिनींच्या सन्मानासाठी आणि सन्मानासाठी माझा लढा सुरू ठेवणार आहे," असेही राज्यपाल बोस म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
कोलकाताच्या हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यामध्ये महिलेने राज्यपालांविरोधात तक्रार दाखल केली."मी राजभवनात कंत्राटावर काम करते. १९ ल रोजी राज्यपालांनी मला थोडा वेळ काढून माझ्या सीव्हीसह भेटण्यास सांगितले. २४ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि काही वेळ बोलल्यानंतर त्यांनी मला स्पर्श केला. मी त्यानंतर कसे तरी मी ऑफिसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांनी (राज्यपालांनी) मला २ मे रोजी पुन्हा बोलावले. मी माझ्या पर्यवेक्षकाला माझ्यासोबत कॉन्फरन्स रूममध्ये नेले कारण मी घाबरले होते. काही वेळ कामाबद्दल बोलून त्यांनी पर्यवेक्षकाला जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी बढती मिळण्याबाबत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते म्हणाले की,ते मला रात्री फोन करतील आणि मला हे कोणालाही सांगू नकोस, असे म्हणाले. मी नकार दिल्यावर त्यांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी विरोध केला आणि निघून आले," असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.