मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बोगस डॉक्टरकडून उपचार करुन घेणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. डॉक्टरनं दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केली आहे.
महिला रुग्णावर उपचार करताना संबंधित डॉक्टरनं एक इंजेक्शन दिलं. त्यानंतर महिलेचा पाय आणि वरचा भाग निळा पडण्यास सुरुवात झाली. पाय जड झाल्यानं वेदनाही महिलेला जाणवू लागल्या. त्यामुळे महिलेला पुन्हा डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी महिलेला उज्जैन येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. कुटुंबीय जेव्हा महिलेला उपचारासाठी उज्जैन येथे घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
डॉक्टरनं चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेतली असून डॉक्टरविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. तसंच चौकशीला सुरुवात केली आहे. तनोडिया येथे राहत असलेल्या महिलेची प्रकृती बिघडल्यानं कुटुंबीयांनी तिला एका खासगी दवाखान्यात नेलं होतं. पण डॉक्टरनं केलेल्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला असल्याचं स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिक्षक रणजीत सिंगर यांनी सांगितलं आहे. प्रथम दर्शनी माहितीनुसार तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.