अहमदाबाद : पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतरही तिला पुन्हा लग्न करण्याचे आश्वासन देत वर्षभर तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवणे एक एनआरआय व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. महिलेने त्याच्यावर विनयभंग आणि बलात्काराचा आरोप ठेवला असून यामुळे दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
46 वर्षांची ही महिला गुजरातच्या बडोद्यामध्ये अकाऊंटंट म्हणून काम करते. तर तिचा पूर्वाश्रमीचा पती अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाला राहतो. त्याच्यावर महिलेने घटस्फोटानंतरही एकत्र राहण्याचा आरोप केला आहे. तसेच या काळात त्याने शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर या एनआरआय पतीने आपण दुसरे लग्न करणार असल्याचे या महिलेला समजल्याने तिने असे घाणेरडे आरोप लावले असल्याचे पोलिसांना सांगितले.
या महिलेने एनआरआय पतीवर बडोद्याच्या पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा एनआरआय पती गुजरातच्या उच्च न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
तसेच न्यायालयाने दोन्ही बाजुंना हा तिढा सामजस्याने सोडविण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या महिन्यात पोलिसांनी आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. महिलेच्या तक्रारीनुसार त्यांचे लग्न 1996 मध्ये अमेरिकेत झाली होती. लग्नानंतर ते कॅलिफोर्नियाला रहायला गेले. यानंतर 2007 मध्ये त्यांना मुलगी झाली.
सासरच्या मंडळींसोबत वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे दोघांनी 2015 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तिच्या पतीने तिला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवत एकत्र राहण्यासाठी मन वळविले होते. तसेच आपल्या आईला समाधान मिळण्यासाठी आपण घटस्फोट घेतल्याचे त्याने महिलेला सांगितले होते. यामुळे हे दोघेही अमेरिकेमध्ये पुन्हा एकत्र राहत होते.