नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत 33 वर्षीय महिलेला मारहाण करत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला आधी लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, नंतर तिचे कपडे फाडून टाकण्यात आले. महिलेची चूक फक्त एवढीच होती की, तिने बेकायदेशीर दारुविक्रीविरोधात आवाज उठवला होता. बुधवारी रात्री दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांच्या टीमसोबत महिलेने एका घरावर टाकण्यात आलेल्या बेकायदेशीर दारुविक्री छापेमारीत भाग घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेला येथे राहणा-या या महिलेने बेकायदेशीरपणे होत असलेल्या दारुविक्रीला विरोध केला होता. बुधवारी रात्री महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल आणि त्यांच्या टीमने 'फाइट द फिअर' मोहिमेअंतर्गत नरेलामध्ये छापेमारी केली. महिला त्यांना एका घरात घेऊन गेली होती, जे आशा आणि राकेश यांचं होतं. तिथून दारुच्या 350 बाटल्या जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोहिणीचे डिसीपी रजनीश गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, 'गुरुवारी दुपारी आशा यांच्यासहित अनेक लोकांनी मिळून महिलेवर हल्ला केला. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे'. 'महिलेला गंभीर जखमा झाल्या आहेत. मात्र कोणतंही फ्रॅक्चर नाही', अशी माहितीही त्यांनी दिली. पण महिलेला नग्न करुन धिंड काढण्याचा आल्याची माहिती त्यांनी फेटाळली आहे. जेव्हा मारहाण झाली तेव्हा महिलेचे कपडे अनेक ठिकाणाहून फाटले होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण स्वाती मालीवाल यांनी सांगितलं आहे की, 'गुरुवारी सकाळी 11 वाजता महिलेला घराबाहेर काढून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तिचे कपडे फाडण्यात आले आणि नग्न धिंड काढण्यात आली'.
दिल्ली महिला आयोगाने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं की, 'राजधानीत अशी घटना होणं हे अत्यंत लाजिरवाणं आहे. हस्तक्षेप करुन पोलिसांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी नायब राज्यपालांकडे करतो'.
महिला सध्या रुग्णालयात भर्ती असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 'आमच्या कॉलनीत खुलेपणाने दारुविक्री होते. याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा मला अशी शिक्षा देण्यात आली'. आरोपींनी स्वाती मालीवाल यांच्या घरी जाऊन त्यांचीही नग्न परेड काढण्याची धमकी दिल्याची माहिती महिलेने दिली आहे.