जयपूर - एका आजारी महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाच तांत्रिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील चौघांना अटक झाली असून मुख्य आरोपी गजेंद्र सिंह अजूनही फरार आहे. या पाच तांत्रिकांनी आजारी महिलेला डॉक्टरकडे नेण्यापासून तिच्या नातेवाईकांना रोखले. आपण तंत्र-मंत्रांच्या आधारे महिलेला रोग मुक्त करु, तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन दिले. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आपण तिला पुन्हा जिवंत करु असे कुटुंबियांना सांगत तिचा मृतदेह 45 दिवस खोलीत बंद करुन ठेवला.
राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहरात ही घटना घडली. अनिता असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या भावाने शामने या प्रकरणी एफआयआर दाखल केला. जानेवारी महिन्यात अनिता आजारी पडली. तिचे आई-वडिल तिला मांत्रिकांकडे घेऊन गेले. अनिताला सैतानी शक्तीने झपाटले असून आपणच तिला बरे करु शकतो असा दावा या मांत्रिकांनी केला. त्यांनी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यापासूनही रोखले.
14 जानेवारीला अनिता बेशुद्ध पडली. त्यावेळी तांत्रिकांनी तिला तिच्या घराच्या रुममध्ये बंद केले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अनिताला तिच्या खोलीमध्ये बंद केल्यानंतर ती स्वत:च्या पायावर चालत बाहेर येईल असे खोटे आश्वासनही त्यांनी दिले. मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरु नये यासाठी ते खोलीमध्ये, मृतदेहावर अत्तराची फवारणी करायचे. या दरम्यान त्यांनी अनिताच्या दोन बहिणी आणि तिच्या आई-वडिलांना घराबाहेर पडू दिले नाही.
27 फेब्रुवारीला अनिताला ज्या खोलीत बंद करुन ठेवले होते तिथून दुर्गंधी येऊ लागली. त्यावेळी अनिताची बहिण मोहिनी कशीबशी घरातून बाहेर पडली व तिने जवळच राहणाऱ्या भावाचे शामचे घर गाठले व सर्व प्रकार सांगितला. त्याने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उजेडात आला.